Tuesday 3 February 2015

एका व्हाट्सअॅप गृपचे बंद होणे...

मित्रांनो काल दि. ३१ डिसेंबरला वर्ष सरत असताना आम्ही व्हाट्सअॅपवरील आमचा "कान्हदेश मंच" गृपला निरोप दिला. साधारणतः वर्षभरापूर्वी या एपचा फारसा प्रचार नसताना त्याचा माणसांची जोडणी आणि सहज व्यक्त होण्याचे माध्यम ही गुणवैशिष्ट्ये लक्षात घेवून आम्ही हा गृप सुरू केला होता. जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना रितसर विनंती करून या गृपमध्ये सहभागी केले होते.


आ. भरतदादा अमळकर, आ. युसूफ मकरा, आ. विद्याधर दंडवते, आ. डाॅ. सतीश खडसे आ. सुरेश केसवानी या ज्येष्ठ मंडळींसह आ. अशोकभाऊ जैन, आ. अरविंद लाठी, आ. संजय बिर्ला, आ. लक्षिमिकांत मणियार, आ. नितीन रेदासानी, आ. किरण बच्छाव, आ. रवींद्र लढ्ढा, प्रा. यजुर्वेंद्र महाजन, प्रा. गोपाल दर्जी, आ. योगेश चौधरी, आ. किरण राणे, आ. अजय राका, आ. नितीन लढ्ढा, आ. शंभू पाटील, अॅड. जमिल देशपाडे, अॅड. संजय राणे, अॅड. केतन ढाके, आ. गजानन मालपुरे, आ. अनिल जोशी, आ. शैलेंद्र चव्हाण, डाॅ. महेंद्र काबरा, डाॅ. राजेश पाटील, आ. प्रविण पगारिया, आ. अनिल कांकरिया, आ. संजय कापडणीस, आ. पो. नि. काईंगडे, आ. भवानीप्रसाद अशी विभिन्न क्षेत्रातील ५२ वर मंडळी जवळपास वर्षभर एकत्र होती. या गृपचे नियोजन मी, आ.अनंत भोळे आणि आ. सचिन नारळे करीत होतो.

या गृपमध्ये शहर विकासावर, समाजासमोर अकस्मात येणारे प्रश्न, आनंद-दुःख, अनुभव यावर चर्चा व्हावी ही मर्यादा निश्चित केली होती. या गृपचे नाव सुरूवातीला "आम्ही जळगावकर" होते. नंतर "खान्देश विकास मंच" केले. आ. अशोकभाऊंनी आग्रह करून "कान्हदेश विकास मंच" करायला लावले. गृप तसा चांगला सुरू होता. काहीना काही विषय रंगत. कधीकधी शायरीचा माहोल असे. कधी राजकारणावर चर्चा असे. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक काळात मात्र राजकारण विषय बंद होता. अगदी ठरवून. शहरातील मान्यवरांचे छंद समोर आले.

 मध्यंतरी शहर विकासावर सक्रिय झालो. आ. संजय सावकारे, मनपा आयुक्तांनी गृप मैंबर्स सोबत अनौपचारिक चर्चा केली. यावर काही मंडाळींनी आमची दारू पार्टी झाली असा प्रचार केला. मनपाच्या एका उप पदाधि-याने वृत्तपत्रांमध्ये गृपच्या नावाने गरळ ओकली. आम्ही पब्लिक, मनपा, पदाधिकारी यांच्या सहकारातून काही करावे का ? यावर काम करीत होतो. शाळा दत्तक घेणे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह बांधणे, रस्ते दुभाजक दुरूस्ती, उद्यान दुरुस्तीवर फोकस होता. मनपा आयुक्तांनी कराराचा विषय न ठेवता तीनही कामांना परवानगी पत्रे दिली. ज्यांनी कामे करण्याचा शब्द दिला होता मात्र, त्या संबंधितानी तो गेल्या ६ महिन्यांत पाळला नाही. आ. सचिन नारळे यांनी समन्वयक म्हणून फोन केले. एका प्रतिष्ठित महिलेने नंतर फोन घेणे बंद केले. व्हाट्स एप गृपमधून फार काही सामाजिक काम करायची ईच्छा कधीच नव्हती पण, केवळ गप्पा नको तर कृती हवी असा विषय होता. किमान लोकांनी विषयावर हो/नाही एवढेतरी अभिव्यक्त व्हावे ही माफक अपेक्षा होती. यावर भाष्य करताना आ. शंभूअण्णा म्हणाले, हा चर्चेचा गृप आहे. संस्था किंवा संघटन नाही. त्यामुळे अपेक्षा ठेवू नका. मला त्यांचे म्हणणे पटले. विचार केला, आपण गृप का सुरू केला ? हाय-हैलोसाठी नाही. विचार व्यक्त करण्यासाठी, पण ते सुद्धा १०/१२ सदस्यच करतात. मी या गोष्टींचा वारंवार विचार करीत होतो. असे असेल तर का गृप करायचा ? साध्य काहीच नाही. त्यामुळे मी दोन वेळा गृप बंदचा विषय मांडला. काही सदस्य नाही म्हणायचे. त्यावर काही काळासाठी गृप सुरु ठेवला. काहींना वाटले मी मुद्दाम अधुनमधून बंदचे बोलतो.

माझा एक स्वभाव दोष आहे, तो म्हणजे नापसंत काम मी जास्त दिवस स्वतःच्या किंवा इतरांच्या समाधानासाठी सुरू ठेवू शकत नाही. अखेर कान्हदेश मंच गृपला बंद करायचा निर्णय घेतलाच. दि. ३१ ला रात्री प्रारंभ होत असताना मी गृप बंद केला. आता पुन्हा गृपचा विषय नाही. गृपमधील मान्यवर दुरावले असे मी मानत नाही. सर्व जण कुठे ना कुठे भेटत राहतील... कान्हदेश मंच गृपचा एक जुळाभाऊ खान्देश मंच होता. तोही बंद केला. महिलांच्या खान्देश महिला मंच मधूनही बाहेर पडलो.

(गृप बंद करताना सर्व मान्यवर सदस्यांना भूमिका स्पष्ट केली आहे.)


Posted on FB - १ जानेवारी २०१५

No comments:

Post a Comment