Monday 9 February 2015

सार्वत्रिक असंतोषाची कृतीदर्शके: आंदोलन, चळवळ, संघटन, अभियान, सेवा



धिक-जादा-जास्तीचे मिळविण्याचा हक्क किंवा अधिकार हा प्रत्येक वर्ग, गट किंवा घटकातील समाजाला हवा आहे. या अधिकारासाठी किंवा मागणीसाठी सामाजिक असंतोष अथवा अस्वस्थता दर्शविणारे विविध मार्ग समाजात अवलंबिले जातात. त्याचे स्वरुप हे आंदोलन, चळवळ, अभियान, संघटन अथवा सेवा यांच्या माध्यमातून असते.

समाजाचा विकास हा लोकसंख्यात्मक वाढ आणि गरजेच्या भाषा, सोयी-सुविधांचा यंत्र-तंत्रात्मक विस्तार यातून होत असतो. लोकसंख्या वाढीचे गुणोत्तर हे सार्वत्रिक सुविधांच्या उपलब्धतेशी नेहमी व्यस्त, अपुरे, अधुरे अथवा कमकूवत असते. हीच बाब लक्षात घेवून केंद्र किंवा राज्य सरकार नावाची यंत्रणा अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अथवा बीओटी असे तत्व, नियम, अटींच्या नियंत्रणात सर्वांना समान संधी देत असल्याचे दर्शवून आहेत त्या सोयी-सुविधांची विभागणी उपलब्ध करुन देत असते. सरकारचे हे धोरण स्वतःचा चेहरा कल्याणकारी राज्य असल्याचे भासवत असला तरी त्यातून सार्वत्रिक समाधानासोबतच नाराजीचे विभिन्न वर्ग, गट आणि घटक तयार होत असतात, हा जगभरातील समाजजीवनाचा शाश्वत व चिरंतन अनुभव आहे.

समाजातील प्रत्येक घटक हा व्यक्ती आणि कौटुंबिक स्वरुपातून उत्पन्न वाढीचा प्रयत्न करीत अधिकाधिक सोयी-सुविधा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाचे उत्पन्न हे त्याचे कार्य, काम, सेवा यावर अवलंबून असते. यातून भांडवलदार, कारखानदार, उत्पादक, पुरवठादार, वितरक, वाहक, साठा करणारे, घाऊक, किरकोळ, ग्राहक, लाभार्थी, उपभोगकर्ता, वापरकर्ता, नोकरदार, सेवार्थी असे अनेक वर्ग, गट आणि घटक समाजात निर्माण झाले असल्याचे पहिले सत्य आहे. यातील प्रत्येक घटकाला मिळणारा उत्पन्नाचा किंवा लाभाचा हिस्सा ठरलेला आहे. हा कमी-अधिक हिस्साही असंतोष किंवा अस्वस्थतेचे कारण ठरतो. वर्ग, गट आणि घटकांची विभागणी प्रामुख्याने आर्थिकस्तरात केली जाते. सरकारी भाषेत हा आर्थिकस्तर दारिद्रयरेषेच्या खालचे आणि वरचे अशा पद्धतीने केली जाते. आपल्याला एकत्र दिसणारा समाज हा भाषा, जात-पात, धर्म, लिंग यासोबतच अर्थिक विषमतेत विभागला आहे हेही दुसरे सत्य आहे.
समाजातील कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा-सवलतीच्या वाटणीत कमी-अधिक लाभ मिळणारा वर्ग, गट किंवा घटक हा सातत्याने अस्वस्थ असतो. सध्या आहे त्यापेक्षा अधिक आपल्या पदरात कसे पडेल, आपल्याला इतरांपेक्षा जास्त लाभ कसा मिळेल, लाभाचा हिस्सा हा आज आणि उद्यासाठी कायम स्वरुपी हक्क म्हणून कसा आबाधित राहील? याचाच विचार हा वर्ग करीत असतो.
अधिक-जादा-जास्तीचे मिळविण्याचा हक्क किंवा अधिकार हा प्रत्येक वर्ग, गट किंवा घटकातील समाजाला हवा आहे. या अधिकारासाठी किंवा मागणीसाठी सामाजिक असंतोष अथवा अस्वस्थता दर्शविणारे विविध मार्ग समाजात अवलंबिले जातात. त्याचे स्वरुप हे आंदोलन, चळवळ, अभियान, संघटन अथवा सेवा यांच्या माध्यमातून असते. या निदर्शकांची रचना ही सकारात्मक-नकारात्मक, हिंसक-अहिंसक, सहकार्य करणारी-असहकार करणारी, प्रस्थापित यंत्रणेसाठी पोषक-अथवा परिवर्तन, बदल घडविणारी असते. कोणत्याही प्रकारच्या आंदोलन, चळवळी, अभियान याचा तोंडवळा हा वरील प्रकारच्या निदर्शनातूनच इतरांच्या समोर येतो.
समाजातील वर्ग, गट अथवा घटकांच्या निश्चित अशा अपेक्षा, इच्छा, मागण्या, हक्क, अधिकार, लाभ अथवा विरोध, प्रतिबंध, नकार यासाठी आंदोलनांची रचना केली जाते. या रचनेचे अंतिम साध्य, उद्दिष्ट किंवा प्राप्त करायचे ध्येय्य निश्चित असते. अंतिम पोहचण्याची जागा निश्चित केल्यानंतर सुरू होणाऱ्या असंतोष-अस्वस्थता दर्शक संघर्षाला आंदोलन, चळवळ किंवा अभियानाचे स्वरुप प्राप्त होते. या प्रकारच्या संघर्षाला आपण लढा, लढाई किंवा विद्रोह असेही संबोधन करतो. आंदोलन, चळवळ अथवा अभियानाच्या रचनेत जसे साध्य काय करायचे ते निश्चित असावे लागते तसेच या लढ्याचे नियमन व नियंत्रण करण्यासाठीही नेतृत्वाच्या अधिकारांची एक उतरंड अथवा चढण निश्चित करावी लागते. तशी ती नसेल तर आंदोलने, चळवळी किंवा अभियान भरकटण्याची श्नयता असते.

कोणतेही आंदोलन, चळवळ किंवा अभियान हे सरकारी यंत्रणा अथवा प्रस्थापित यंत्रणांच्या विरोधात उभे रहाणारे संघटन म्हणून ओळखले जाते. आंदोलन, चळवळ आणि अभियानाच्या रचनेतून निश्चित असे संघटन उभे राहते. हे संघटन स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करते अथवा आंदोलनातून पर्यायी संघटना, शाखा उभी राहते. संघटन हे आचार, विचार याच्याशी संबंधित शक्ती प्रदर्शनाचे साधनही असते. सशक्त संघटनचा विस्तार संख्यात्मक आणि गुणात्मकदृष्ट्या समाजातील इतर घटकांवरही आपला प्रभाव निश्चित करीत असतो. संघटनाची सकारात्मकता निश्चित लाभाच्या पलिकडीची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठीही सहाय्यभूत ठरत असते. उद्दिष्ट, हेतू साध्य झाल्यानंतर आंदोलन, चळवळ किंवा अभियान थंडावू शकते मात्र, त्यातून निर्माण होणारे संघटन हे नवनव्या क्षेत्रात गरजा, लाभ पाहून विस्तारते.
संघटन किंवा संघटनेची बांधणी भक्कम झालेली असेल तर त्यातून सेवाविषयक गरजांची पूर्तता होणे सुरू होते. संघटनाच्या सकारात्मक विस्तारात भावी  गरजांशी संबंधित सेवांचा विस्तार होत असतो. एखादी सेवा ही वर्ग, गट आणि घटकांशी संबंधित असली तरी बऱ्याचवेळा ती सामाजिक व संघटनात्मक मर्यादा ओलांडून इतरांना मदत, सहकार्य करणारी असते. विविध सेवांच्या विस्तारातून सामाजिक सोयी-सुविधा-गरजा यांचा विकास होत असतो. शिवाय आवश्यक, गरजू घटकांपर्यंत लाभ, मदत पोहचत असते. विविध क्षेत्रांतील सेवांचे जाळे हे सरकारी यंत्रणांच्या हेतू साध्य करण्यासाठी किंवा लाभाच्या निश्चित उद्दिष्टापर्यंत पोहचण्यासाठी पूरक, साहाय्यभूत ठरत असते. याच सेवांचा चेहरा आपण स्वयंसेवी संस्था अथवा सामाजिक संस्था म्हणून ओळखत असतो.

सरकारी किंवा कोणत्याही प्रस्थापित यंत्रणेच्या विरोधात जेव्हा विद्रोहाची तयारी होते तेव्हा आंदोलन सुरू होते. विद्रोह छोटा असेल तर ते आंदोलन गट, समुहापुरते असते. मात्र, विद्रोह हा व्यापक जनहिताचा असेल तर ते आंदोलन जनआंदोलन म्हणून विस्तारते. सर्वच आंदोलनांचा शेवट हा विजय मिळवून किंवा हेतू, उद्दिष्ट साध्य करुनच होतो असे नाही. काही वेळा आंदोलने थंडावतात, कमकूवत होतात किंवा हळूहळू कालबाह्य होतात. प्रत्येक आंदोलनासमोर सरकार किंवा प्रस्थापित यंत्रणा झुकतेच असे नाही. पूर्ण, मध्य किंवा अल्प उद्दिष्ट, हेतू साध्य होण्यावरही आंदोलनाचे यश अवलंबून असते.

स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक प्रकारच्या आंदोलनांचा प्रारंभ झाला. स्वातंत्र्य मिळविण्याच्या हेतूने सुरू झालेल्या आंदोलनात इतर अनेकही लहान-सहान आंदोलने काळ व गरजपरत्वे उभी राहिली. महात्मा गांधीजींनी आंदोलनांचे स्वरुप पूर्णतः बदलून टाकले. अहिंसात्मक आंदोलन, असहकार आंदोलन, मौनधारण करुन उपोषण, पदयात्रेच्या माध्यमातून दांडीयात्रा अशा आंदोलनांची इतिहासाच्या पानात गौरवाने नोंद झालेली आहे. अगदी अलिकडे अण्णा हजारे यांचे नवीदिल्लीत लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी झालेले उपोषण आंदोलनही याच प्रकारातले म्हणावे लागेल.
आंदोलनाचा मुख्य हेतू हा सरकार किंवा प्रस्थापित यंत्रणेत अपेक्षित सुधारणा, बदल घडविणे हा असतो. यासाठी संघटीतपणे आणि सुनियोजितपद्धतीने आखणी केली जाते. यातील सुधारणांचे विषय हे राजकिय, सामाजिक, आर्थिक यासह कोणतेही असू शकतात. अगदीच उदाहरण द्यायचे तर वृक्ष बचावासाठीचे चिपको आंदोलनचे देता येईल. याशिवाय सविनय कायदे भंग आंदोलन, मीठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन, बारडोलीचा सत्याग्रह, असहकार आंदोलन हे विविध हेतूंच्या साध्यतेसाठी करण्यात आल्याचे संदर्भ आपणास माहित आहेत.

भारतात आंदोलनांचा इतिहास हा फकिर-सन्याशी विद्रोहापासून सुरू होतो. साधारणपणे 1770 च्या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीच्या अत्याचाराच्या विरोधात सन्याशांनी हे आंदोलन सुरू केले होते. मात्र, यात यंत्रणेला लुटणे आणि त्रास देणे हाच मुख्य हेतू होता. मोगलांच्या काळातील बेकार झालेले सैनिक, आपत्तीत सापडलेला शेतकरी आणि काही फकिर-सन्याशी हे यात सहभागी होते. कंपनी सरकारनेच याला सन्याशी विद्रोह हे नाव दिले होते. यानंतर 1905 मध्ये कंपनी सरकारच्या बंगाल विभाजन निर्णयास विरोध करण्यासाठी बंग-भंग आंदोलन झाले. 1920 मध्ये गांधीजींचे असहकार आंदोलन झाले. यानंतर बेमुदत उपोषण आणि एकाच ठिकाणी ठिय्या मारून सत्याग्रह आंदोलनही गांधीजींच्या नेतृत्वात सुरू झाले. त्यांच्यानंतर आचार्य विनोबा भावे यांचे भूदान आंदोलन हे लक्षवेक्षी आणि लोकांच्या दातृत्व भावनेला कृतिशील करणारे ठरले. अगदी अलिकडे मेधा पाटकर यांच्या नेतृत्वात सरदार सरोवर प्रकल्पाच्या विरोधासाठी नर्मदेच्या पुराच्या उभे राहून केलेला सत्याग्रह सुद्धा याच सत्याग्रह प्रकारातला ठरतो.
आंदोलनाप्रमाणेच चळवळ हेही गट, वर्ग अथवा घटकांच्या असंतोषाचे कृतीदर्शक आहे. हा शब्दप्रयोग आंबेडकर विचाराच्या प्रचार व प्रसारासाठी वापरला जातो. सामान्य माणसांच्या विशिष्ट उद्दिष्टपूर्तीसाठी केले जाणारे संघटीत प्रयत्न म्हणजे चळवळ अशी ढोबळ व्याख्या आहे. चळवळ आणि आंदोलनात एक मुख्य फरक असा आहे की, चळवळ करणारी माणसे स्वतःच्या आणि समाजाच्या उद्दिष्टांसाठी स्वतःमध्येही मानसिक बदल करुन घेतात आणि त्याच उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी तत्त्वाला धरून लढा देतात. आंदोलनात शिरलेली माणसे तत्त्व किंवा उद्दिष्ट पूर्ततेसाठी त्याच मानसिकतेेचे असतील असे नाही. येथे उदाहरण द्यायचे असेल तर अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार निर्मूलन आंदोलनात शिरलेल्या अपप्रवृत्तींचे देता येईल. याशिवाय आंबेडकर विचारधारेच्या चळवळीतील अनेक नेते सत्ताप्राप्तीसाठी विचार व कृतीपासून भरकटल्यामुळे आज ती चळवळ कमकुवत होवून केवळ गटा-तटातील राजकिय पक्षांची शकले म्हणून अस्तित्वात आहे, असे म्हणता येईल.
चळवळीच्या संदर्भात अजून एक व्याख्या वाचनात आली. ती म्हणजे, स्वतः किंवा इतरांनी निर्माण केलेल्या दुःखाचा विनाश करुन मैत्रीच्या भावनेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी निरपेक्ष व सामुहिक प्रयत्न म्हणजे चळवळ होय. चळवळ काही काळ थंडावू शकते मात्र, ती लोप पावली, संपली असे होवू शकत नाही. आंदोलन मात्र उद्दिष्ट प्राप्तीनंतर संपू शकते, थांबू शकते. चळवळीसाठी सामुहिक नेतृत्व असू शकते. आंदोलनातही नेता किंवा सामुहिक नेतृत्व असू शकते.
या प्रमाणे मिशनची व्याख्याही एक ठराविक उद्दिष्ट ठराविक काळात साध्य करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न होय. मिशनसाठी नेता असतो. त्याच्या हातात नियंत्रण असते. मिशनमध्ये जुळवाजूळव, तडजोडी आणि उद्दिष्टात बदल केला जातो. कधीकधी मिशनही अंतर्गत कलहामुळे फसते.

सत्ता किंवा प्रस्थापित यंत्रणेच्या विरोधात असंतोष व्यक्त करण्याचे निदर्शक वापरताना व्यक्ती सुरक्षा, सार्वजनिक मालमत्ता संरक्षण आणि अती भावनाशिलता हे टाळणे आवश्यक असते. मात्र, आज काल असंतोषाची तीव्रता दाखविण्यासाठी याच परिमाणांचा वापर होताना दिसतो. अशी आंदोलने किंवा चळवळी हिंसक ठरतात. हिंसात्मक चळवळींचा एक दोष असतो. तो म्हणजे, बऱ्याचवेळा त्यात दूरदर्शिपणाचा अभाव असतो. त्याचा फटका गट,  वर्ग, घटकाला बसतो. असंतोषाच्या निदर्शकांचा सारासार आणि विवेकवादी विचार केला तर आंदोलने, चळवळी, मिशन, अभियान का होतात? असा प्रश्न पडतो. याचे उत्तर शोधताना लक्षात येते की, समाजातील भ्रष्ट व्यवहार, सुविधा-सोय-हक्क-लाभ नाकारणे, नियमबाह्य वर्तन, न्यायासाठी विलंब अथवा अन्याय आणि कायद्याबाहेरील कृती या पाच कारणांमुळे समाजात असंतोष निर्माण होतो. सर्वसामान्य भारतीय माणूस जेव्हा आर्थिक, सामाजिक आणि राजकिय परिस्थितीत नाडला जातो तेव्हा तो स्वयंप्रेरणेने किंवा इतरांच्या नेतृत्वात असंतोष प्रकट करु लागतो. त्याला वाटते माझे प्रश्न इतरांनी सोडवावेत, माझे प्रश्न इतर सोडवत नाहीत किंवा माझ्या अडचणींकडे जाणून-बुजून दूर्लक्ष होत आहे. याच भावनातिरेकातून असंतोष निर्माण होतो.

येथे एक मुद्दा प्रामुख्याने मांडावा लागेल. तो हाच की, बदलत्या काळानुसार मानवी गरजा भागविण्याची जबाबदारी केवळ प्रशासन, सरकार, प्रस्थापित किंवा खासगी यंत्रणांची नाही. कोणतीही सोय-सुविधा निर्मितीसाठी आता
लोकसहभागही तेवढाच महत्त्वाचा आणि गरजेचा झाला आहे. हा सहभाग परिश्रमातून असेल किंवा आर्थिक सहकार्यातून असेल. लोकसहभागाच्या या मुद्यापासून कोणीही लांब राहू शकत नाही. गोवर्धन पर्वत उचलण्याचा प्रयत्न कृष्णाच्या करंगळीने होईल पण सोबतच्या मंडळींना आपापल्या काठ्याही लावाव्या लागतीलच, असे सकारात्मक विचार समाजात कृतिशीलपणे रुजविणे आवश्यक झाले आहे. असंतोषाच्या निदर्शकांना संयम, सहकार्य, समन्वय ही सुद्धा परिमाणे लाभली तरच सामाजिक स्वास्थ, सौख्य आणि शांतता टीकून राहील असे भाकित येणाऱ्या काळाची पावले ओळखून व्य्नक्त करता येईल.


 
(आंदोलन-चळवळ-संघटना विषयावर दिवाळी अंक २०१४ - तरुण भारत)

No comments:

Post a Comment