Tuesday 3 February 2015

देशदूतचा निरोप घेताना..!

गेले 15 दिवस घरीच आहे. अजून 4 दिवसांनी "देशदूत"मधील काम थांबणार. नव्या जबाबदारीचे वेध लागले आहेत. सध्या फावला वेळ खुप असल्यामुळे गेल्या 25 वर्षांच्या वाटचालीचे अवलोकन केले.

एक बाब प्रकर्षाने जाणवली

- "मैत्रिच्या बुरख्यात शत्रू अनेक भेटले पण मित्राच्या रुपात जिवाभावाचे सखा दोन, तीनच जोडता आले"

देशदूतमधील प्रवास साडेचार वर्षांचा आहे. आधी नाशिक आणि नंतर जळगाव येथील युनिटमध्ये कामाची संधी मिळाली. दोन्ही ठिकाणचे दिवस समाधान आणि आनंद देणारे राहीले. नाशिकला दैनंदिन कामासोबत थेट संचालकांशी संबंध येत होता. नव्या कल्पनांचा शोध आणि त्याचे नियोजन, अंमलबजावणी आणि उद्दिष्ट पूर्तता हा विषय . जनकभाऊ सारडा यांचा आहे. त्यामुळे त्यांच्याशी माझा सूर उत्तमपणे जुळला. ते नव्या कल्पना मांडत, आम्ही त्यावर काम करीत असू. आमच्या नव्या कल्पनांना ते पाठींबा देत. यातून कामाच्या चांगल्या नव्या पद्धती निर्माण झाल्या. संपादकांचा सकाळी आणि वृत्त संपादकांचा रात्री मोबाइल संवाद सुरू झाला. देशदूतच्या शब्दगंध पुरवणीच्या आशय मांडणीचे प्रयोग केले गेले. कधी काँमन तर कधी स्प्लिट पुरवणीचा आग्रह असे. पहिली आयपीएल आल एडीशन कोआर्डिनेट करून धडाक्यात कव्हरेज दिले. याशिवाय भविष्यवेध पुरवणीला सुद्धा नवे रुप दिले. नवे लेख देवून मांडणी बदलली. काँलेजरोड पुरवणी सुद्धा अशीच जोमात काढली.

नाशिकच्या ग्रामीण संपादन मांडणीचे काम मी स्वत: मागून घेतले. तेव्हा अंक वेळेत छपाई करणे हेच एक आव्हान होते. मी अंक वेळेत देण्याचे नियोजन करीत नाही, मी वेळेला माझ्या मागे धावायला लावतो. कोणतेही काम वेळेपूर्वी पूर्ण करा आणि नंतर निवांत बसा, काम संपले तर घरी जा, ही माझी थिएरी आहे. अर्थात, यात गुणवत्ता हा निकष असतोच. "सकाळ" मध्ये नाशिक, जळगाव, अकोला नंदुरबार येथे काम करताना हेच वर्क कल्चर निर्माण केले. (नंदुरबारचे दिवस माझ्यासाठी सूवर्ण अक्षरात लिहिण्याचे आहेत. त्यावर सविस्तर कधीतरी बोलू) देशदूतमध्ये नाशिक जळगावला हिच कार्यशैली कायम ठेवली. नाशिकचा ग्रामीण अंकवेळेत जावू लागला.

नाशिक ग्रामीणसाठी बातम्यांचे रंगीत पान सुरू केले. ग्रामीण बातमीदार खुश झाले. येथे आपरेटर मंडळींविषयी लिहावे लागेल. इतर संपादकिय सहकारी वेळेत पाने लावायला रडत, मात्र मी काम करीत असताना पाने कशी उभी राहत समजत नसे. दोनवर्षे दर शनिवारी माझी रात्रीची 12 ची नाशिक- जळगाव बस कधी चुकली नाही. आज ही मंडळी माझ्या गुडबुकमध्ये आहेत. मला सर्वाधिक कामाचा आनंद येथेच मिळाला.

सिडकोत देशदूत कार्यालय सुरू करण्याच्या नियोजनात मी होतो. नाशिक मनपा, नाशिक जि.. निवडणूक नियोजन दणक्यात केले. शब्दगंधचा खास अंक काढला. जाहिरात व्यवस्थापक श्री. सचिन कापडणी यांचे ग्रामीण नियोजन, वर्धापनदिन अंक नियोजन यात अमोल सहकार्य मिळाले. या माणसाने दौ-यावर "खाऊ" घालण्याचे व्रत निष्ठेने पाळले. मला फक्त खाणे हाच प्रकार आवडतो.

नाशिकच्या कामाच्या संदर्भात एक गोष्टीचा उल्लेख करावाच लागेल, तो म्हणजे, देशदूतचे संस्थापक . देवकिसनजी सारडा यांनी अग्रलेख लिहीण्याविषयी रोज केलेले संस्कार. त्यांचे वाचन अफाट आहे. अनुभव माझ्या वयाच्या दुप्पट. त्यामुळे मराठी शब्दांचा वापर, अर्थ, छटा याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. त्यांचा संस्कृतचा अभ्यास असल्यामुळे अग्रलेख प्रारंभ, शेवट यात संस्कृतचा वापर असतो. प्रश्नार्थक आणि मिश्किल, बोचरे लिहून अग्रलेख कसा वाचनिय होतो, हे "मोठ्या भाऊंनी" सांगितले. दोन वर्षे हा वसा मी सांभाळत होतो. विषय निश्चित केल्यावर आम्ही अग्रलेख लिहायचो आणि मोठेभाऊ त्यावर संपादकिय संस्कार करीत. (आताही करतात)

जळगावला बदली मला अनपेक्षितपणे मिळाली. मी माझ्या गावात आलो, पण माणसं आपली असतील का? हा प्रश्न होता. गेल्या अडीच वर्षांत श्री. हेमंत अलोने आणि श्री. मनीष पात्रीकर यांनी मला दिलेल्या बरोबरीच्या वागणुकीमुळे मी आज म्हणू शकतो, होय देशदूतमध्ये ही दोन माणसं मी मित्र म्हणून जोडली आहेत. श्री. पात्रीकर हे व्यवस्थापक झाल्यानंतर माझ्या कामाच्या कक्षा विस्तारल्या. दुस-या भाषेत सांगायचे तर त्यांनी माझ्या क्षमतांचा वापर करून घेतला.

. भवरलालजी जैन यांची पुरवणी, बँक पुरवणी, गोदावरी महिला पुरस्कार, बाफना युवा पुरस्कार, युवकांचा मुंबई विधीमंडळ दौरा, मनपा निकाल स्पर्धा असे उपक्रम एक हाती राबविले. श्री. अलोने यांनी नेहमी बरोबरीची वागणूक दिली. मी नाराज झालो असेल तेव्हाही या माणसाने मला सोबत घेतले. श्री. अलोने यांना मी काही विषय विश्वासाने सांगितले, अगदी लवकरच देशदूत सोडणार या विषयासकट.

. भवरलालजी जैन यांच्या पंचहात्तरीची 16 पानी विशेष पुरवणी केल्यानंतर तीचे प्रकाशन आणि . मोठेभाऊ यांनी त्यांच्या आवडत्या वडाजवळ दिलेले अमृततुल्य जेवण मी इतर सहकारी विसरू शकत नाही.

श्री. पात्रीकर यांच्या विषयी एक विशेष बाब लिहावीच लागेल ती म्हणजे या माणसाने आम्हाला पाहिजे तेव्हा जेवायला बाहेर नेले. नेहमी चांगल्या हॉटेलचा शोध घेतला. कारण माझा खाणे हाच शौक आहे. दुसरी बाब म्हणजे, व्यवस्थापक म्हणून सर्वाधिक गिफ्ट देणारा हा एकमेव मित्र. आम्ही तिघांनी बहुतांश उपक्रम यशस्वी केले. फेसबुकवर देशदूतच्या त्रिमूर्ति अशा कामेंटही मिळत. आमच्या उपक्रमांचा मास्टरस्ट्रोक होता आफ सिझनमध्ये घेतलेला वाहन मेळावा. तेथे 20 वर चारचाकी 50 वर दुचाकी वाहने विक्री झाली. याचा कंटेन्ट प्लान माझा होता.

आम्ही सोबत फिरलोही खुपवेळा. काठीची होळी, लोणार सरोवर, शेगांव खेडेकरांचा तमाशा पाहणी दौरा लक्षात राहणारे. एकदा आफिशिअल दौ-यात गरज म्हणून मी मालेगांव ते नाशिक क्रूझर गाडी विक्रमी वेळेत चालवली. आणि हो त्या दिवशी ती गाडी मी पहिल्यांदा पळवली होती.

माझे सकाळ आणि देशदूतमध्ये व्यवस्थापकांशी नेहमी चांगले जमले. सकाळमध्ये कै. भागवतसाहेब, त्यानंतर श्री. नंदन मिठारी, श्री. विनायक दाते, नागपूर आवृत्ती अंतर्गत श्री. राजेश पाटील, श्री. सुनिल लोंढे आणि जळगाव आवृत्तीत श्री. अनिल जोशी यांच्याशी माझे खूप चांगले संबंध राहिले. अनिल जोशींशी माझी मैत्री आजही जगजाहीर आहे.

नाशिकमध्ये दीपक बैचे याने मला आनलाइन व्हायला शिकवले. इंटरनेटचा वापर लाइट, टेलिफोन, विमा, टाटास्काय आदींची बिले किंवा हफ्ते भरण्यासाठी कसा करावा? हे बैचे यांनी शेजारी बसून सांगितले. गेल्या 3 वर्षांपासून मी कुठेही रांगेत उभा राहत नाही.

साडेचार वर्षांत देशदूतने मला अनेक गोष्टी दिल्या. संचालकांनी विश्वास पाठबळ दिले. कमी सोर्स असताना काम करण्याची समजदारी दिली. अनंत अडचणी असताना उद्दिष्ट साध्य करण्याचा संयम दिला. सर्वांत महत्वाचे म्हणजे, निंदक कितीही दिशाभूल करीत असतील तरी शांतपणे करीत असलेल्या कामात यश मिळतेच हा आत्मविश्वास दिला. मी चार दिवसांनी कागदोपत्री देशदूतचा कर्मचारी नसेन, पण तेथे मी जोडलेल्या मोजक्याच माणसांच्या मनांत कुठे तरी माझ्यासाठी जागा निश्चित असेन, हा विश्वास मला आहे. तोच सोबत घेवून मी बाहेर पडतोय...

जळगाव युनिटमधील डीटीपी प्रमुख योगेश शुक्ल आणि सर्व आपरेटर एस एल, सचिन, प्रकाश, सुषलर, टेमकर, जोगी, सुधाकर, निलेश, अत्तरदे, शिरीष, सागर शेड्यूलचे नितीन, महेंद्र यांनी शब्दाखातर सहकार्य केले. अंक 12 ला पैक करायचा हे सांगितले की तसे होत होते. हाच अनुभव नाशिकचा. राजाभाऊ, आढाव, जगदीशदादा, बर्वेदादा, मकासरे, संदीप, अवसरमोल, प्रशांत, श्येड्यूलचे गर्दे आणि इतरांनी असेच काम केले. कै. आर. डी. जोशीकाकांनी शुद्धलेखन सुधारले. यांचा सहवास सकाळमध्ये होता. राजाभाऊ म्हणत, तिवारीसाहेब तुम्ही सर्व 12 पाने लावा...अंक कसा वेळेत जात नाही?

चुकीची दुरूस्ती...

देशदूतचा निरोप घेताना, हा लेख नाही. संस्था आणि व्यक्तिंविषयी यापूर्वी अव्यक्त केलेले मत आहे. मी दि 26 जूनला दुपारी 12 च्या दरम्यान फेसबुकवर लेखन केले. आज दि.27 जूनला पहाटे 5.45 पर्यंत 68 प्रतिक्रिया आणि 115 पसंती नोंदल्या गेल्या होत्या. बहुधा मला माझे मत बदलावे लागेल...मैत्रिच्या मोहात अनेक मित्रच जोडल्याचे दिसते. प्रतिक्रिया पसंती नोंदणा-यात बालमित्र , गल्लीमित्र, वर्गमित्र, गावमित्र, काँलेजमित्र, कामाच्या ठिकाणचेमित्र, नियमित- अनियमित भेटणारे मित्र असे सारेच आहेत. हे सर्वच्या सर्व चांगले आहेत म्हणून मी चांगला असेन, किंवा वाईट कोणीच भेटले नाही म्हणून मीही वाईट नसेन...

कबीर म्हणतो -

बुरा जो देखन में चला, बुरा ना मिलया कोए |
जो मन देखा आपना, मुझसे बुरा ना कोए ||

वाईट माणसं शोधायला बाहेर पडलो तर वाईट कोणीच दिसला नाही. पण जेव्हा स्वत:कडे पाहिले तर माझ्यापेक्षा वाईट दुसरा कोणी दिसला नाही.

(Posted on FB - दि. २६ जून २०१४)


1 comment:

  1. tiwari sir aajwar FB war aapalya post pahat hoto.. aaj site war aapala ha lekh wachala.. ek changala patrkar kay asu shakato yachi ZALAL disali..

    ReplyDelete