Sunday, 29 March 2020

निष्क्रीय कारभारी ... दुर्लक्षित सरदार ... भाग २

जळगाव शहरात कचऱ्याचा प्रश्न सोडविताना मनपातील कारभारी म्हणजे, अधिकारी-कर्मचारी आणि सरदार म्हणजे निवडून दिलेले, त्यातही सत्ता हाती असलेले लोकप्रतिनिधी यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या भिक्कारचोटपणावर आपण चर्चा करीत आहोत. जळगाव शहरात कचऱ्याची व अस्वच्छतेची समस्या गेल्या १५ वर्षांपासून कायम आहे. म्हणजेच, हा कालावधी पूर्वी सत्तेत असलेल्या खान्देश विकास आघाडीचा आणि सध्या सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा आहे. जळगाव शहरातून ओला व सुका असा एकत्रित सुमारे १२० टन घन कचरा रोज गोळा होऊ शकतो. अर्थात, तो गोळा केला तर. वेगवेगळ्या सर्वेक्षणातून रोज गोळा होऊ शकणाऱ्या कचऱ्याचा आकाडा निश्चित झालेला आहे. अजून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. कचऱ्या विषयीचा सर्व गोंधळ सुरु असताना मनपाच्या आरोग्य व सफाई विभागाला स्वतंत्रपणे उपायुक्त लाभलेले आहेत. यात कहार आणि दंडवते यांची ही कारकिर्द  आहे. जबाबदारी पूर्ण न करणाऱ्या या उपायुक्तांवर कधी कोणत्या कारवाईचा ठराव मनपाच्या सभेत झालेला दिसत नाही.
 

Friday, 27 March 2020

‘वॉटरग्रेस’ च्या हिस्सेदारीतील भिक्कारचोट ! - भाग १

जळगावकरांची प्रचंड उत्सुकता ताणून धरलेल्या या विषयावर गंभीरपणे लेखन करताना २ खुलासे प्रारंभीच मी स्पष्ट करायला हवेत. पहिला खुलासा म्हणजे, शहराशी संबंधित स्वच्छता सेवा अंमलबजावणीतील गलथानपणा समजून घेण्यासाठी नागरिकांनी पाठिंब्याचे संदेश पाठवून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. लेखनासाठी १ हजार वाचकांचे पाठबळ मागीतले होते. प्रत्यक्षात १,५०० वर नागरिकांनी पाठिंब्याचे संदेश पाठविले. फेसबुक, व्हाट्सॲप, मेसेज या ३ सोशल माध्यमांवर आलेल्या संदेशांसह जवळपास ७० जणांचे काॅल मला आले. अशा प्रकारे जळगावकरांनी माझ्या लेखणीवर विश्वास व्यक्त केला. त्या सर्वांचा मी व्यक्तिगत आभारी आहे.

Thursday, 5 March 2020

'जैन है ... तो मुमकिन है ...

संपूर्ण जगभरात व्याप आणि जळगाव शहरात मुख्यालय असलेला 'जैन उद्योग समुह' परिस्थितीतून निर्माण झालेल्या काही तात्कालिक कारणांमुळे अडचणीत आहे. समुहाच्या संचालकांनी ही बाब भागभांडवलदार सभासदांच्या सभेत यापूर्वी प्रांजळपणे स्पष्ट केली आहे. जवळपास साडेसहा हजारावर कामगार-कर्मचाऱ्यांचे काही महिन्यांपासूनचे वेतन थकले आहे. तरीही सर्वजण रोज कामावर येत असून दैनंदिन जबाबदारी निभावत आहेत. कर्ज आणि व्याजाचे रोजचे देणे सुरु असल्यामुळे इतर आर्थिक व्यवहार प्रलंबित आहेत. अशा स्थितीत उद्योग समुहात पुरेशी गुंतवणूक करु शकणारे भागीदार शोधणे किंवा गरज भागवता येईल एवढ्या रकमेचा विदेशातील एखादा प्रकल्प विक्रीत काढणे या पर्यायांवर समुहाचे संचालक अथक परिश्रम घेत आहेत.

Tuesday, 4 February 2020

गुलाबभू, अमृत योजनेत लक्ष घाला !


आ. पालकमंत्री महोदय गुलाबभू पाटील यांना जयमहाराष्ट्र

एवढ्या जाहिरपणे आपणास पत्र लिहिण्यास कारण की, कॅबिनेट मंत्री नियुक्ती होऊन तीन महिने व पालकमंत्री होऊन महिनाभर झाला आहे. एवढ्या काळात कॅबिनेट मंत्री होण्याचा आनंद हा नव्याचे ९० दिवस म्हणून साजरा होत असेल. आजूबाजूला आता ४/६ समर्थकांचे, हितचिंतकांचे, आडवळणाने लाभ घेणाऱ्यांचे कोंडाळे तयार झाले असेल. यापूर्वीच्या पालकमंत्र्यांचा असाच अनुभव आम्हाला आहे. रेस्ट हाऊसला पालकमंत्र्यांच्या कक्षात तासंतास बसलेले मोजके चेहरे आम्ही पाहिले आहेत. बहुधा असे चेहरे सोबत असल्याशिवाय पालकमंत्री पदालाही शोभा येत नसावी. पूर्वीच्या काळी राजे, महाराजेंच्या सोबत हाकारे असायचे. 'खबरदार ... होशियार' म्हणायचे काम ते करीत. पोवाडे गाणाऱ्यांसोबत झिलकरी असतात. 'जी र र ...जी' म्हणायला. आज काल मंत्र्यांभोवती अशी मंडळी लागतेच. दादा, भाऊ आले ... गेले सांगायला. असो हे विषयांतर झाले.

Friday, 24 January 2020

‘शिल्पकवडा मूर्तीकार’ किशोर सोनवणे

आयुष्यात घडणाऱ्या ‘दैवी योगायोगांवर’ फारसा विश्वास दाखवला जात नाही. तशा योगाचा अनुभव आल्यानंतर त्याची चर्चा सोशल मीडियात करणे हे अलिकडे विवादाचे कारण होते. ‘दैवी’ या शब्दाला विरोध करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनवाले, देव न मानणारे निधर्मी, देवादिकांच्या स्तोमाला विरोध करणारे बि ग्रेडी आणि देवादिकांशी संबंधित ब्रह्मवृंदाला सतत शिव्याशाप मोजणारे नव्या पिढीतील संशोधक हे चेकाळल्यागत प्रतिक्रिया (कमेंट) नोंदविण्यासाठी सरसावतात. अनुभव सांगणाऱ्यास अभिव्यक्त होण्याचा अधिकार नाकारत स्वतःच्या प्रतिक्रियांना अभिव्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मानत, नको त्या ठिकाणी प्रतिक्रिया देणाऱ्यांच्या टोळ्या समाजमाध्यमात सक्रिय आहेत. अशा ‘ट्रोलर’ मंडळींच्या भाऊगर्दीत आपण अनुभवलेल्या दैवीयोगाचा किस्सा ‘वाजवून’ सांगणे आवश्यक असते. माझ्याबाबतीत तसाच एक अनुभव काल शुक्रवारी आला. तो यावेळी सांगतो.

Thursday, 16 January 2020

वंशावळीचा वाद - गागाभट्ट ते संजय राऊत!

महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत घाणेरड्या पातळीवर नेण्याचे पातक सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केले आहे. राष्ट्रीय पुरूषांच्या प्रतिमांची तुलना आणि विडंबन सोबत जात, समाज अशा विषयांवर उखळ्यापाखळ्या काढल्या जात आहेत. संपूर्ण भारतभूमीचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची इतर नेत्यांशी तुलना करण्याच्या अपराधात छत्रपतींच्या सातार गादीच्या वंशाकडे पुरावे मागण्याचा प्रमाद संजय राऊत या पत्रकाराकडून घडला आहे. अर्थात, राऊत विरोधात अश्लाघ्य भाषेतील टीका टीपणी समाज माध्यमात सुरु झाली आहे. हा प्रसंग लक्षात घेता इतिहासातील दुसऱ्या  प्रसंगाची प्रकर्षाने आठवण होते. तो प्रसंग म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक प्रसंगी महाराजांच्या कुळाला  शुद्र ठरवून मंगल विधी करण्यास ब्रह्मवृंदाने नकार दिला होता. तेव्हा खुद्द महाराजांनाही आपल्या क्षत्रिय कुळाची वंशावळ शोधावी लागली होती.

Saturday, 4 January 2020

जळगाव मनपात कोण आहेत हे निर्लज्ज ?

जळगाव महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. कारभारी आमदार मामा आणि महापौर मामी आहेत. यांचे नेते माजी पालकमंत्री गिरीशभू आहेत. बाकी उरलेले भाजपचे नगरसेवक म्हणजे किस गली मे खसखस आहेत. जमेल तेथे शहराचे वाट्टोळे करणे आणि सरकारी निधीतून पैसा खाणे असा एक कलमी कार्यक्रम सुरु आहे. पैसा खाण्यात संघ परिवाराशी संबंधित चेहरे आणि त्यांचे नातेवाईकही आघाडीवर आहेत.

Thursday, 2 January 2020

बस्स झाले लवंगी फटाके ...

नाथाभाऊ यांना पत्रकार मित्राने लिहिलेले खुले पत्र 

आ. नाथाभाऊ गेल्या दोन दिवसात तुम्ही केलेल्या आरोपाच्या बातम्या सोशल मीडियातून वेगात व्हायरल झाल्या. तुम्ही म्हटले की, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून तुमची उमेदवारी कापली. गेल्या ३ वर्षांत हा विषय वारंवार चावून चोथा झाला आहे. त्यामुळे या बातमीला नाथाभाऊंचा गौप्यस्फोट किंवा नाथाभाऊंचा बाॅम्बगोळा असा शब्दही आता वापरला जात नाही. तुम्ही केलेल्या आरोपाचे गांभीर्य नंतर तुमच्याच कृतीने संपवून टाकले. भाजपच्या एका बैठकीत तुम्ही आणि गिरीश महाजन एकत्र आले. या बैठकीत तुम्ही दोघे जवळ बसले. शिवाय, हास्य विनोदात एकमेकांच्या टाळ्याही घेतल्या. तुमच्या या कृतीला माध्यमांनी लगेच मनोमिलन म्हणून टाकले. नाथाभाऊ तुम्ही असे करुन काय मिळवित आहात ? आता तुमचे बोलणे हे गौप्यस्फोट किंवा बाॅम्बगोळेही राहिले नाहीत. ते फुसके लवंगी फटाके ठरताहेत. वाटू दे तुम्हाला व तुमच्या काही समर्थकांना वाईट, पण जे खरे ते लिहायला हवे.

Saturday, 14 December 2019

आरोपांच्या पिंजऱ्यात खडसेच कशासाठी ?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपत आरोप प्रत्यारोपांची सुदोपसुंदी सुरु आहे. एकनाथराव खडसे व पंकजा मुंडे पालवे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट टार्गेट करुन व्यक्तिगत असंतोष प्रकट केला आहे. याच अनुषंगाने खडसे व मुंडे पालवे यांच्या विषयी सलग तीन लेख लिहिले. अडचणीत वापरले जाणारे बहुजन कार्ड, पराभवाच्या मागील वास्तव कारणे आणि गेल्या चार वर्षांत पक्ष व नेत्यांविषयी केलेली कृती याविषयी लेखांमध्ये परखड भाष्य होते. खडसे यांच्या समर्थक, हितचिंतक आणि व्यक्तीनिष्ठावंतांनी त्यावर फारशा प्रतिक्रिया दिल्या नाहीत. मात्र, 'पित्याचे आहेर आणि कन्येला माहेर' या लेखानंतर खडसे यांच्या दोन-तीन समर्थकांनी संपर्क करुन काही मुद्दे मांडले. माझ्या लेखांमधील एक बाजू बरोबर असली तरी त्याची दुसरी बाजू सुध्दा समोर यायला हवी असा आग्रह त्यांनी केला. राजकारणाचे निरीक्षण करताना व त्यामागील कारणांची मिमांसा करताना तटस्थता व निरपेक्षता जपायला हवी म्हणून खडसेंची दुसरी बाजू मांडणेही गरजेचे आहे हे मलाही जाणवले. अर्थात, या दुसऱ्या बाजूशी मी सहमत आहे असे मुळीच नाही.

Friday, 13 December 2019

पित्याचे 'आहेर' आणि कन्येला 'माहेर'

महायुती मोडून शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत सरकार सुरु केले. भाजप सत्तेपासून लांब गेली. भाजप अंतर्गत देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोंड सुख घ्यायची संधी काहींना मिळाली आहे. या मंडळींमध्ये एकनाथराव खडसे हे सध्या आक्रमक आहेत. फडणवीस यांना घालून पाडून बोलायची एकही संधी खडसे सध्या सोडत नसल्याचे दिसते आहे. अर्थात, गेल्या साडेतीन-चार वर्षांत खडसेंचा अजेंडा हाच होता. सार्वजनिक ठिकाणी जेव्हाही बोलाल तेव्हा फडणवीसांवर टीका करा आणि भाजप नेतृत्वातील युती सरकारला घरचे आहेर द्या ! खडसेंनी सन २०१७ पासून केलेली जाहीर वक्तव्ये आज क्रमाने वाचली तर लक्षात येते की, भाजपत राहून खडसे विरोधी पक्षाचे काम करीत होते. फडणवीस यांचे वस्त्रहरण करीत होते. खडसेंनी फडणवीस सरकारवर जेवढे आरोप केले तेवढे विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही केले नाहीत.